विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीनं ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

नगरविकास मंत्री शिंदे यांनी घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी केली. 

रूग्णालयातल्या रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर मधल्या मुंबई महापालिकेच्या कोव्हीड सेंटर इथं हलवलं. तर इतर रुग्णांना विरार मधल्याचं विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

शिंदे यांनी मृतांच्या नातलगांची भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर त्यांनी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीनं सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ज्ञांचीही मदत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.