ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पश्चिम आणि मध्य रेल्वेची नवीन नियमावली जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन मोहिमेशी सुसंगत नियमावली मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयार केली आहे. त्यानुसार उपनगरी गाड्यांमधून सरसकट सर्वांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल मात्र ओळखपत्र सोबत बाळगावं लागेल.

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर म्हटलंय की केंद्र आणि राज्यसरकारी कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, डॉक्टर्स, रुग्णालय कर्मचारी, लॅब टेक्नीशियन अशांनाच तिकिट मिळू शकेल.

विशेष क्षमता असणाऱ्या व्यक्तींना तसंच उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना एक सोबती नेण्याची परवानगी असेल.

UTS किंवा वेंडींग मशीनमधून तिकिट मिळणार नाही. पश्चिम रेल्वेनेही अशी यादी प्रसिद्ध केली आहे.

गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात केलेली नाही.

गेल्या वर्षी मार्च मध्ये थांबलेली उपनगरीय रेल्वे सेवा आजही पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही.