येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससीमार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य सचिवांनी दिली.
बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.