देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी  देशातल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालाशी संवाद साधला.

सर्वाधिक वेगानं दहा कोटी लोकांचं लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून लसीकरण उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला, असं मोदी म्हणाले. यासाठी देशात नवीन लसीकरण केंद्र उघडली गेली. लोकांना त्यासाठी उद्युक्त केलं गेलं. यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबंधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील, असं मोदी म्हणाले.

गेल्या वर्षभरात कोविड आपत्तीला सामोरे जाताना जनतेनं दिलेल्या सहकार्याची मोदी यांनी प्रशंसा केली. जनतेच्या याच भावनांना आता पुन्हा एकदा नव्यानं उजागर करण्याची आणि त्यांना सक्रीय करण्याची गरज आहे.

सरकारी, निमसरकारी, अशासकीय, स्वयंसेवी अशा विविध स्वरूपात काम करणाऱ्या देशातील संस्था-संघटनांच्या सामुहिक ताकदीचा उपयोग करून घेत हे संकट परतवून लावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असं आवाहनही मोदी यांनी केलं. कोविड संकटाचा सामना करण्यासाठी राज्यपालांनी राज्य सरकारांना सहकार्य करावं आणि या प्रयत्नांना जनआंदोलनाचं स्वरूप द्यावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या वेळी केलं.