नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक मधल्या प्राणवायू गळती दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कारवाई केली जाईल, या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मात्र या दुर्दैवी घटनेचं  कुणीही राजकारण करू नये, संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं. भविष्यात अशा घटना  घडू नये, आरोग्य यंत्रणांचं मनोबल खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी प्रशासनानं अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे, असंही ते म्हणाले.

यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा, तसंच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तात्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.