२५ वर्षांवरील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांना विनंती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचं दिसत आहे, त्यामुळे २५ वर्षांवरच्या सर्वाना कोविड प्रतिबंधक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मध्यंतरी देशातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये, ४५ वर्षावरच्या सर्वाना लस देण्याची ठाकरे यांची मागणी मोदी यांनी मान्य केली होती. त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून लागू केलेले कडक निर्बंध, उपाययोजना आणि लसीकरणाबाबत या पत्रात त्यांनी प्रधानमंत्र्यांना माहिती दिली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात ४५ वर्षावरच्या सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे, त्यासाठी लशीच्या दीड कोटी मात्रा मिळाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सहाय्यानं आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नानं या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.