राज्यात सोमवारी ७१ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आजवरचे सर्वाधिक ७१ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट होऊन ५० हजारापेक्षा कमी म्हणजेच ४८ हजार ७०० रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ झाली आहे. यापैकी  एकूण ३६ लाख १ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या ६५ हजार २८४ वर पोचली आहे.

राज्याच्या कोरोनामुक्ती दरात वाढ होऊन तो ८२ पूर्णांक ९२ शतांश टक्क्यावर पोचला आहे, तर कोरोना मृत्यू दर दीड टक्क्यावर खाली आहे. सध्या राज्यभरात  ६ लाख ७४ हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.