कोरोना नियंत्रणासाठी पंचसूत्री काटेकोरपणे अवलंबावी - पंतप्रधानांचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि गांभिर्याने अवलंबावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिले.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच देशव्यापी लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय पथकं पाठवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

या जागतिक संकटाला तोंड देताना व्यापक जनजागृतीवर भर द्या असं सांगतानाच कोरोनाविरुद्धच्या लढाईला लोकचळवळीचं स्वरूप यायला हवं, यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मोदी यांनी नमूद केलं. मास्कचा १०० टक्के वापर; हातांची स्वच्छता; सार्वजनिक ठिकाणांचं निर्जंतुकीकरण; या कोरोना संबंधीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी; या महिन्यात ६ ते १४ तारखेदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात येईल असं पंतप्रधानांनी सांगितलं.

प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना, त्या भागात आवश्यक उपाययोजना राबवताना त्या त्या भागातल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत घ्या; असं आवाहन त्यांनी केलं. सर्व राज्यांनी आरोग्य यंत्रणा बळकट कराव्यात, रुग्णांना उपचारासाठी खाटांची उपलब्धता; त्याचं योग्य नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं, गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून नियमांचं पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवा असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव, नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.