पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना काल मध्यरात्रीच्या सुमाराला अटक केली.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणी सहभाग असल्याच्या आरोपावरून काल वाझे यांची चौकशी केल्यानंतर तपास संस्थेनं त्यांना अटक केली.

वाझे यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या २८६, ४६५ आणि ४७३ यांसह विविध कलमे आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमाखाली आरोप दाखल केलं असल्याचं तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु तो फेटाळण्यात आला. सुरूवातीला हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे होतं. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर गेल्या सोमवारी एनआयएनं हे प्रकरण हाती घेतलं होतं.या प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्याचच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरु आहे.

या चौकशीतून जे काही समोर येईल, त्यानुसार राज्य सरकार आणि केंद्रसरकार कायदेशीर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना दिली.