गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा करायला सांगितलं होतं असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.
यासाठी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
खंडणी उकळण्यामधे मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत. हे साऱ्या देशानं पाहिलं असेली ही गंभीर बाब आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली.
हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे असा आरोप भाजपा खासदार कपिल पाटील यांनी केला. त्यावर प्रत्त्युत्तर देताना, राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा आणि शिवसेना सदस्यांमधे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले.
त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात सीएसआर निधीबाबतच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की महाराष्ट्रात खंडणीखोरी सुरु असून ही गंभीर बाब आहे.
सीएसरआर अर्थात, कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या ७२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे १२ हजार ७०० कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.