किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना धक्का लागू नये-मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच.पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचं संरक्षण आणि संवर्धनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना जराही धक्का लागता कामा नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ते काल कांदळवन संवर्धनाबाबत वर्षा निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.कांदळवनाच्या जागेत अनेक बांधकाम व्यावसायिक आणि इतर लोकांनी अतिक्रमणं केली आहेत. ही अतिक्रमणं तातडीनं काढावित आणि यापुढं अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.ऐरोली इथल्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या किनारी आणि सागरी जैव वैविध्याविषयीची माहिती यांत्रिक उपकरणांद्वारे दृष्य, श्राव्य आणि स्पर्शिक घटकांच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोचवण्यासाठी मुंबईत माहिती केंद्र सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कांदळवनांबद्दल जनतेला आपुलकी वाटेल, असे उपक्रम राबवावेत, असं त्यांनी सांगितलं. कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या मार्गातल्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. प्रस्तावित जाइंट्स ऑफ द सी म्युझियम, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यासाठी जेट्टीचा विस्तार, भांडुप पंपिंग स्टेशन इथं सुविधा पुरवणं अशा प्रलंबित ज्या योजना आणि उपक्रम मार्गी लावण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं