मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याच्या विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्त्या करणारे दादरा-नगरहवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. या दरम्यान भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांचे सदस्य तसेच सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले.

त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच तालिका सभापती राजन साळवी यांनी सभागृहाचं  कामकाज आणखी अर्ध्या तासासाठी तहकूब केलं . त्यानंतर पुन्हा एकदा दिड आणि नंतर २ वाजेपर्यंत असं एकूण चार वेळा विधानसभेच कामकाज तहकूब करण्यात आलं.

यानंतर दोन वाजता कामकाज पुन्हा सुरु झालं. त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात झिशान सिद्दीकी यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वांद्रे ते कुलाबा दरम्यान किनारपट्टीवरील एसआरए योजनेतील विकासकाला मिळणाऱ्या भागाचा लीलाव करण्याचा विचार मांडला.