सार्वजनिक आरोग्य विभागातली 'क' आणि 'ड' संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरण्याची आरोग्यमंत्री यांची विधानपरिषदेत ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, त्यामुळे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली 'क' आणि 'ड'  संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कोविड काळात आरोग्य सेवेत तात्पुरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.

कोविड काळात सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात २६ हजार ४८६  कंत्राटी पदं भरली. तात्पुरती नियुक्ती दिलेल्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन आरोग्य सेवा दिली, या सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे मात्र या तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नाही , यातून मार्ग काढला जाईल, तसंच यांचा भर्तीच्या वेळी तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना अनुभवाच्या अनुषंगानं प्राधान्य दिलं जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.

महिलांची बदनामी करणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी सदस्य मनीषा कायंदे यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी केली. त्यावर शासनान याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे असे निर्देश विधान परिषद सभापती राम राजे निंबाळकर यांनी दिले. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.