पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची  बिनविरोध निवड झाली आहे.

उपमहापौरपदाच्या निवडीसाठी आज महापालिकेची विशेष सभा महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या सभेचे पिठासीन प्राधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूकीच्यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, प्रभारी कायदा सल्लागार तथा उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले. 

नवनिर्वाचित उपमहापौर नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पिठासीन प्राधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.