राज्यातील महाविद्यालयांचा येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली. शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क निश्चित केलं जातं. त्या अंतर्गत आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, वैद्यकीय, कृषी, विधि अशा विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्यात आलं असून त्याची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणानं संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे.