राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दहा हजार १८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ४४० झाली असून मृत्यूदर दोन पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार ८० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले.

राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ९२ हजार ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मराठवाड्यात काल नव्या एक हजार ११६ रुग्णांची नोंद झाली. काल १० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, बीड जिल्ह्यातील दोन आणि नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४४० रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १९७, नांदेड १५०, लातूर ८०, बीड १०८ परभणी ८४, हिंगोली २७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३० नवे रुग्ण आढळून आले.