इंधन दरवाढ म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा : रुपाली चाकणकर
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात वारंवार पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल शंभरीपार झाले असून घरगुती गॅसची अवघ्या एकवीस दिवसात शंभर रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल पंपावर मोदींची छबी झळकविणारी जाहिरात करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या जाहिरातीत पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. पेट्रोल, गॅसची भाववाढ मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला महाराष्ट्रात रविवारी ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत, हि दरवाढ म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे, अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चिंचवड येथे केली.
रविवारी (दि. 28 फेब्रुवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रुपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, संगिता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर तसेच मनिषा गटकळ, पल्लवी पांढरे, ज्योती गोफणे, भारती कदम, मनिषा जठर, निर्मला माने, लता पिंपळे, प्रेमा शेट्टी, आरती जाधव, दिपाली देशमुख, संगिता आहेर, कविता आल्हाट, सरिता झिमरे, आशा शिंदे आदी उपस्थित होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात वारंवार पेट्रोलची दरवाढ केली आणि अवघ्या वीस दिवसात घरगुती गॅसची शंभर रुपयांनी भाववाढ केली. देशाच्या इतिहासात एवढी दरवाढ कधीच झाली नाही. एक डिसेंबरला 594 रुपयांना मिळणारा घरगुती गॅस 4 फेब्रुवारीला 719 रुपयांना मिळत होता. आता हाच घरगुती गॅस 23 फेब्रुवारी पासून 819 रुपयांना झाला आहे. गॅस आणि शंभरी पार केलेला पेट्रोलचा दर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. हि भाववाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी. पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींची जाहिरात करण्यासाठी केंद्र सरकारने 5425 कोटी रुपये खर्च केला आहे. यापुर्वी पंपावर उज्वला गॅस योजनेची जाहिरात होती. त्यामध्ये पाच कोटी कुटूंबांना उज्वला गॅस योजनेतून गॅस देण्याचे जाहिर करण्यात आले होते. योजना कोणापर्यंत पोहचली हा संशोधनाचा भाग आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा वैशाली काळभोर यावेळी म्हणाल्या की, दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. यात दोनशेहून जास्त शेतकरी मृत्यू पावले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांचे रोजगार गेले आहेत. त्याचे केंद्र सरकारला काही देणे घेणे नाही. स्वत:ची छबी जाहिरातीतून झळकविण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांनी भरलेला कराचा पैसा खर्च केला आहे. त्यातून पंतप्रधान मोदी घराघरात पोहचायचा प्रयत्न करतात. पोकळ आश्वासने देतात आणि जनतेची दिशाभूल करतात. एवढी मोठी भाववाढ आम्ही महिला मान्य करणार नाही. आधुनिक मानसाचा प्रवास पुन्हा आदी मानवाकडे होत आहे. गॅस परवडत नाही म्हणून महिला आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करु लागल्या आहेत. या केंद्र सरकारचा आज महाराष्ट्रात सर्वत्र राष्ट्रवादीच्या महिला निषेध करुन आंदोलन करीत आहेत. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवडच्या महिलांनी चिंचवड स्टेशन येथे आज आंदोलन करुन भाववाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध केला अशी माहिती वैशाली काळभोर यांनी दिली.
यावेळी महिलांनी पेट्रोल व गॅस दरवाढीच्या विरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.