राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. आरोग्याबाबत सल्ल्यासाठी देशभरातील 35 हजारांहून अधिक रुग्ण या सेवेचा वापर करतात. सध्या ई संजीवनी सेवा 31 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये महाराष्ट्रासह तमिळनाडु, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आघाडीवर आहेत. ई संजीवनी ओपीडीमध्ये पुरूषांच्या तुलनेत सल्ला घेण्यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या अधिक आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार राष्ट्रीय टेलिमेडीसीन सेवा शहरी आणि ग्रामीण भारतातील डिजिटल आरोग्यातील दरी भरुन काढत आहे. तसंच तृणमूल स्तरावर डॉक्टर्स आणि तज्ञांची टंचाई देखील यामुळे दूर होत आहे आणि द्वितीय तसंच तृतीय स्तरावरील रुग्णांवरचं ओझंही कमी होत आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या बरोबरीनं ई संजीवनी देखील देशभरातील आरोग्य यंत्रणेला चालना देत आहे. ई-संजीवनीमध्ये डॉक्टरांच्या दरम्यान आणि डॉक्टर तसंच रुग्णाच्या दरम्यान दोन मंच चालवले जातात. याद्वारे रुग्णांना घरबसल्याच बाह्य रुग्ण सेवा पुरवल्या जातात.