नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

 


पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देश पातळीवर आहे.  संपूर्ण देशाचे लक्ष या शहराकडे आहे.  या शहराच्या भविष्याचा विचार करुन अधिकाधिक लोकाभिमुख विकास प्रकल्प आणि उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचा मानस असल्याचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.    

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार श्रावण हर्डीकर यांच्याकडून राजेश पाटील यांनी स्विकारला.  त्यानंतर आयुक्त पाटील यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या परिचय बैठकीत अधिका-यांसमवेत संवाद साधला. प्रशासनाने सामान्य नागरिकासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून काम केले पाहिजे.  प्रशासनामध्ये एकट्या व्यक्तीकडून काम करणे शक्य होत नसते. यासाठी टीमवर्कची नितांत गरज असते, असे नमूद करुन आयुक्त पाटील म्हणाले, कोणत्याही कामामध्ये स्वयंप्रेरणेने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक कामामध्ये नाविन्यता शोधली पाहिजे. जागतिक पातळीवर सध्या कशाप्रकारे उपक्रम अथवा विकास प्रकल्प राबविले जातात याची माहिती घेऊन प्रत्येकाने आपापल्या विषयात अपडेट असले पाहिजे. नवीन पिढीच्या गरजा ओळखून भविष्यातील उत्कृष्ट शहराची उभारणी आपल्याला करायची आहे.  यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आपले योगदान द्यावे.  सामान्य नागरिकांसाठी आपण काम केले पाहिजे. चांगले काम करणा-याच्या पाठीशी मी निश्चितपणे असेल मात्र जाणीवपूर्वक कामकाजात चुका अथवा दिरंगाईने काम करणा-यांना  कदापीही पाठीशी घातले जाणार नाही असा इशाराही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला.        

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील तसेच नव्याने अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विकास ढाकणे यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.  परीचय बैठकीस अतिरिक्त आयुक्त अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील, नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, अशोक भालकर, संजय खाबडे, रामदास तांबे, प्रविण लडकत, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त सुभाष इंगळे, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते. 

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image