महापालिका प्रशासनाला संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा विसर ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची कारवाईची मागणी

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत, महात्मे युगपुरुष यांची जयंती अथवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत असते परंतु आज विश्ववंद्य संत तुकाराम महाराज यांची जयंती असताना देखील महापालिका प्रशासनाच्या वतीने निगडी येथील त्यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता केली नाही. तसेच, त्यांच्या स्मारकाला पुष्पहार देखील अर्पण केला नाही. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी न करणाऱ्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापुरुष संतांच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे सर्व राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासनास जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीचा विसर पडल्याचे चित्र आज पाहण्यास मिळाले. महापालिकेच्या वतीने निगडी येथे भक्ती व शक्ती चा संगम म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प उभारण्यात आलेले आहे.परंतु आज स्मारकाची स्वच्छता देखील करण्यात आलेली नव्हती, ना त्या स्मारकाला पुष्पहारही अर्पण करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी उत्सवाच्या वेळेस महापालिकेच्या वतीने जो गाजा-वाजा करण्यात येतो तो फक्त नावापुरताच आहे का?

महापालिका प्रशासनाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा विसर पडलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संतांनी स्वतःचे आयुष्य जनकल्याणासाठी अर्पण केलेले आहे,ज्यांच्या अभंग गाथा,ज्यांचे कार्य आजही जीवन जगण्याची प्रेरणा देतात, त्यांच्या जयंतीचा विसर महापालिकेला पडावा हे मोठे दुर्दैव आहे, असे दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.