कोविड-१९ च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. कोविड संदर्भात झालेल्या एका आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मु-काश्मीर या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांसमवेत काल चर्चा केली.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमात ६० वर्षांहून अधिक वयाच्या तसेच अन्य रोग असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लसीकरण केंद्रात नोंदणी करता येईल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

देशभरातल्या १० हजार शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाणार असून खाजगी रुग्णालय लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क आकारु शकतात असेही मंत्रालयाने सांगितले आहे.