भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण दाखल नसतानाही ‘स्पर्श हॉस्पिटल’ने बिलाची मागणी मनपाकडे केली आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरेदी व निविदांमध्ये छुप्या पध्दतीने भ्रष्टाचार होत आहे. शहरात ठिकठिकाणी सुरु असणारी विकास कामे विनाकारण प्रलंबित ठेवून वाढीव बिले सादर केली जात आहेत. याला महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पायबंद घालावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला आहे.

वाकडकर यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मंगळवारी (दि. 9 फेब्रुवारी) याविषयी पत्र दिले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष करण कोकणे आदी उपस्थित होते.

या पत्रामध्ये काळभोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2017 पासून स्थापत्य, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, वैद्यकीय, आरोग्य आदी विभागामार्फत विविध विकास कामांसदर्भात निविदा काढल्या जातात त्यामध्ये बहुतांश वेळा ठेकेदार व अधिकारी मिळून रिंग करुन ठराविक ठेकेदारांनाच निविदा मिळतील अशा प्रकारे निविदा अटी शर्ती ठेवतात. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मार्च 2020 पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला त्याला प्रतिबंध करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाय योजना युध्दस्तरावर चालू केल्या. यामध्ये मास्क, सॅनिटाझर आदी खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. मनपाच्या वतीने आणि खाजगी अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचे घाटत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गांच्या प्रतिबंधासाठी सी.एस. आर. अंतर्गंत विविध खाजगी कंपन्यांनीही मनपास मदत केली. परंतु त्यांनी किती मदत केली, कश्या स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही. कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खाजगी कोविड सेंटरने जर बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत. तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरला बिले अदा केली आहेत त्याचा तपशील द्यावा.

तसेच मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे याची कारणे सविस्तरपणे देण्यात यावी आणि शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यत कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी मनपाने किती रक्कम कश्या प्रकारे खर्च केली याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे सी.एस.आर. मधून खाजगी कंपन्यांनी मनपास किती मदत कश्या प्रकारे केली याचीही सविस्तर माहिती देण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करील असाही इशारा वाकडकर यांनी पत्रामध्ये दिला आहे.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image