राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार - आरोग्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून  त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी  ही सुविधा असणार आहे.

या फिरत्या दवाखान्यात चाचणी प्रयोगशाळेची सुविधा असणार आहे. यातुन ४० प्रकारच्या चाचण्या, सोनोग्राफीसह ८१ प्रकारची औषधं उपलब्ध असतील. महिलांचं  बाळंतपणही त्यात करता येईल, इतक्या सुविधा त्यात असतील,असं टोपे यांनी सांगितलं. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला प्रत्येकी दोन फिरते दवाखाने असणार आहेत. मुंबईतही फिरत्या दवाखान्यात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.