देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसंच सूक्ष्म-लघु- आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज केंद्रीय अर्थसंकल्पातल्या वित्तसेवा क्षेत्रासाठीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते.

वित्तीय क्षेत्रासंदर्भात सरकारचा दृष्टीकोन अगदी स्पष्ट आहे, विश्वास, पारदर्शकता आणि निष्ठा हा वित्तीय क्षेत्रासाठीचा पाया आहे. आपल्या सरकारच्या काळात बँकींग आणि बिगर-बँकींग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

१० वर्षांपूर्वी मोठी कर्ज देण्याच्या नावाखाली वित्तीय आणि बँकींग क्षेत्र दुबळं झालं सध्याच्या सरकारच्या चिकाटीमुळे ते आता रूळावर येत आहे, असं मोदी म्हणाले. अपारदर्शक व्यवहारांची संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली. थकीत कर्ज दडवण्याऐवजी ती सांगणं बंधनकारक केलं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.