ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ – स्मृती इराणी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय ताग उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

देशातील व्यावसायिक ताग बियाणे वितरण योजनेचा प्रारंभ आज सकाळी इराणी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भारतीय ताग महामंडळानं गेल्या वर्षी राष्ट्रीय बियाणे महामंडळाबरोबर तागाच्या १ हजार मेट्रिक टन व्यावसायिक प्रमाणित बियाणाचे वितरण यंदा देशात करण्याबाबत सामंजस्य करार केला होता.

त्यानुसार आज या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.अधिक उत्पादन देणाऱ्या या प्रमाणित बियाण्यांमुळे देशातील ताग उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होणार असून त्यातून चालना मिळणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे ४६ लाख मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे.

देशात रस्ते निर्मितीसाठी आता ज्यूट जीओ टेक्सटाईलचा वापर केला जात आहे. अनेक वस्तू आणि मालाच्या बांधणीसाठी तागाचा उपयोग अनिवार्य करण्यात आला असून त्यामुळे ४ लाख श्रमिक आणि ४० लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे, असंही स्मृती इराणी यांनी नमूद केलं.

कृषी मंत्रालय आणि वस्रोद्योग मंत्रालयामधील समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून २०१४ – १५ मध्ये २४०० रुपये असलेली तागाची किमान आधारभूत किंमत आता वाढवून २०२०– २१ मध्ये ती ४ हजार २२५ रुपये टन करण्यात आल्याची माहितीही इराणी यांनी दिली.