भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला. यानुसार रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ शतांश टक्क्यावर कायम आहे. रिझर्व्ह बँकेंच्या पतधोरण समितीनं आज झालेल्या बैठकित पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेतला, त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

चालू आर्थिक वर्षासह, पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होऊन, विकासाचा वेग वाढता रहावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. २०२१-२२ या आर्थिक वर्षात स्थूल उत्पादन वाढीचा दर १० पूर्णांक ५ शतांश टक्के राहील असा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या या अखेरच्या तिमाहीत महागाईचा दर ५ पूर्णांक २ शतांश टक्क्यावर असल्याचंही दास यांनी सांगितलं.कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्यानं देशातली परिस्थिती पुन्हा एकदा सामान्य पातळीवर येण्याच्या प्रक्रीयेनं वेग धरला असल्याचं ते म्हणाले.

ग्राहकांचा बाजारपेठेवरचा विश्वास अधिक दृढ होत असल्यानं उत्पादन, सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राकडून अपेक्षाही वाढल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.