आसाममधल्या विविध विकास कामांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत.

धुब्री- फुलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजुली पुलाचं भूमीपूजन करून या पुलाच्या बांधकामाचाही प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या पूर्व भागातली दळणवळण सुविधा अधिक सोयीस्कर व्हावी तसंच ब्रह्मपुत्रा  आणि बरक या नद्यांच्या आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा विकास व्हावा हा महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी, बंदरं, जलमार्ग विभागाचे मंत्री मनसुख मांडवीय आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित राहणार आहेत.

निमाती- माजुली बेटांदरम्यानच्या रो-पॅक्स सेवेच्या उद्घाटनानं  महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गावरच्या वाहतुकीला सुरुवात होणार आहे. निमाती- माजुली दरम्यानचं सध्या वाहनांना पार करावं लागणारं ४२० किलोमीटर अंतर रोपॅक्स सेवेमुळं फक्त १२ किलोमीटर इतकं कमी होणार आहे.