पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, लसीकरणासाठी राज्यात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून, पहिल्या दिवशी सुमारे ३५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून, जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतलं कुपर रुग्णालय, या दोन ठिकाणी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

राज्याला कोविड लसीचे नऊ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले असून, दर दिवशी वीस ते पंचवीस हजार जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. घाबरुन न जाता सगळ्यांनी लस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.