राज्यात कोरोना प्रतिबंधंक नियम पाळून साधेपणानं नव्या वर्षाचं स्वागत
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : जगभरात काल नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत राज्यातल्या जनतेनं नव्या वर्षाचं स्वागत साधेपणानं केलं. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी, उद्यानं आणि अन्य ठिकाणी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे गर्दी दिसली नाही. गृह विभागानं जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन केलं आणि घरच्या घरीच साधेपणानं नववर्षाचं स्वागत केलं.
महापुरुषांनी समाजासाठी केलेल्या कामाचं स्मरण व्हावं म्हणून उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांची देखभाल होत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन नववर्ष दिनी आज वाशिम इथल्या तरुणांनी शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली.
नाशिक जिल्ह्यात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधात्मक निबंध लागू असूनही नागरिकांमध्ये उत्साह कायम दिसला. जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नववर्षदिनी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, काल चोवीस तास मंदिर उघडं ठेवण्यात आलं.
धुळे जिल्ह्यात नागरिकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तंबाखू, गुटखा, पान मसाला अशा पदार्थांचं व्यसन सोडण्याचा संकल्प केला. व्यसनमुक्ती संघटनेनं यावेळी या पदार्थांची होळी केली.
नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी आज सूर्यनमस्कार घालून नववर्षाचं स्वागत केलं. दर वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेचे सर्व विद्यार्थी प्रांगणात एकत्र येऊन सूर्यनमस्कार घालतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परस्परांपासून सुरक्षित अंतर राखून केवळ पन्नास विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले.
बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी नववर्षा निमित्त सामाजिक जाणिवेतून गरजूंसाठी थंडीतून बचावासाठी ब्लॅंकेट वाटप केलं. ‘सुंदरबन, आधार माणुसकीचा’ या समाजमाध्यमवरच्या गटानं अनाथ आणि भटक्या नागरिकांसाठी हा उपक्रम राबवला आणि नववर्ष साजरं केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.