कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज होत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

या महिन्याच्या १६ तारखेला या लसीकरणाला सुरवात होत आहे. या संदर्भात काल आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत को-विन सॉफ्टवेअर संदर्भात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.

तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनासंबंधीच्या विशेषाधिकार समितीचे प्रमुख राम सेवक शर्मा बैठकीच्या अध्यक्षपदी होते. कोविड-१९ चे भारतातले लसीकरण हा जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही लस पोहोचावी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ती उपलब्ध व्हावी, हे आमचे लक्ष्य आहे असे शर्मा म्हणाले.

आधार प्रणालीचा या लसीकरणासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे. आधार क्रमांकावर नोंदलेले दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार असून एसएमएसद्वारे लसीकरणाबद्दल संपर्क साधला जाणार आहे. यामध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद, लसीकरणाची तारीख आणि इतर माहितीसह नोंदवली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

देशभरातील कोविड-१९ ची परिस्थिती आणि त्यावरील लसीकरण सुरु करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत.