संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन करून व्यक्त केला संताप ; विधिवत श्राध्द घालून केला महाराष्ट्र शासनानचा निषेध
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासना विरोधात संताप व्यक्त करत निषेध केला आहे. श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. थेरगाव येथील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पिंड घालुन, विधी करून श्राद्ध घालण्यात आले. तसेच या बाबत निर्णय न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.
या श्राद्ध आंदोलना वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी, महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल अपमानकारक आक्षेपार्ह लिखाण केले. तसेच आपल्या अधिकृत पेजवर व्हिडिओ बनवून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे होते. मात्र कारवाई झाली नाही. नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडून कारवाई होईल अशी, आशा अनेकांना होती. मात्र त्यांच्याकडूनही निराशाच पदरात पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच आघाडीतील नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून सत्तेत येतात. मात्र त्यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करायला टाळाटाळ करत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील सर्व समस्या सोडविणार असल्याचा दिखावा करतात. त्यांच्याकडेही अनेक वेळेला पाठपुरावा करून त्यांनीही दखल घेतली नाही. महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडलेला असल्याचे चित्र आहे. शासनाला जागे करण्यासाठी व श्री श्री रविशंकर यांच्यावर एक वर्ष होऊन देखिल गुन्हा नोंदवला नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने श्राद्ध आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन करण्यात आले.
थेरगाव येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता आंदोलन सुरु करण्यात आले. या वेळी केळीच्या पानावर पाच मडके, भात, बुंदी, पाच भाज्या, पाच नैवेद्य, कडधान्ये, हळदी, कुंकू, बुक्का, अगरबत्ती लावून विधिवत पिंड घालून श्राद्ध घालण्यात आले. तसेच श्रद्धांजली वाहून शासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. भविष्यात या आंदोलनाची दाखल न घेतल्यास व श्री श्री रविशंकर याच्यावर गुन्हा दाखल न केल्यास, आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.