राष्ट्रीय छात्र सेनेने नागरिकत्वाची सर्व कार्य पार पाडल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते.

विविध राज्यातल्या छात्रांनी पंतप्रधानांना मानवंदना दिली. चित्तथरारक कसरतींनी आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पंतप्रधानांच्या हस्ते उत्कृष्ट छात्रांना पुरस्कार देण्यात आले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या चमुला सर्वोत्कृष्ट चमू म्हणून गौरवण्यात आले. 

यावेळी बोलताना मोदी यांनी, कोरोना काळात छात्रांनी नागरिकत्वाची सर्व कर्त्तव्ये पळून केलेल्या विविधांगी कार्याचा गौरव केला.

तुम्ही केवळ देशसेवक नाहीत तर राष्ट्ररक्षक आहात, अनेक आव्हाने आज तुमच्यापुढे उभी आहेत आणि ती आव्हाने पार पाडण्यासाठी तुम्ही सज्ज आहात हे बघून मला अतिशय आनंद होत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा विस्तार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चिफ, फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना मोदी यांनी छात्रांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, पंतप्रधान आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक क्रांती” याविषयी बोलणार आहेत.

यावेळी ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कोविडनंतरच्या काळात पुन्हा चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीने दावोसचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.