लोकशाही वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात राजकारणात येण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला संबोधित करताना बोलत होते.

भारताला नव्या उंचीवर नेण्याचं; आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढीच करेल असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. वंशवाद हे राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं मूळ कारण आहे, असं ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देश उभारणीच्या दिशेनं एक पाऊल असून, या माध्यमातून सरकार तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व मोदी यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केलं. वर्षानुवर्षांच्या गुलामीगिरीमुळे भारत चेतनाहीन झाला असताना, भारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रचेतना जागृत करण्याचं काम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलं.

स्वामीजींच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असून; त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असं मोदी म्हणाले. त्यांनी देशवासियांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेत, उत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला. महाराष्ट्राच्या अयति मिश्रा हिला दुसरा, तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला.