उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त शुभेच्छा

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त शुभेच्छा

मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून, देशातील लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने निवडणूक मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत मतदार हा राजा असून, या राजाची ताकद घटनेने त्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारात आहे. देशातील मतदारांनी त्यांना मिळालेली मतदानाची ताकद चांगले लोकप्रतिनिधी निवडून देश घडवण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री केली पाहिजे. स्थानिक स्वराज संस्थांपासून विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदार राजा जागरुक, जबाबदार झाला तरच देशाची लोकशाही टिकणार, वाढणार आणि भक्कम होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले आहे.