बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा पसरू नये यासाठी नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

माणसांमध्ये या रोगाचं संक्रमण होत नसल्यानं घाबरण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं.ते काल वर्षा निवासस्थानी बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेताना बोलत होते.

यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपास्थित होते.मुख्यमंत्र्यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सिंसीद्वारे निर्देश दिले. या रोगाचं तात्काळ निदान होण्यासाठी जैव सुरक्षा स्तर-३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला जाईल.

त्याची कार्यवाही तात्काळ करावी, असं त्यांनी सांगितलं. ज्या भागात बर्डफ्लूचा प्रादुर्भाव नाही अशा भागात अंडी आणि मांस ७० डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्लं तर काहीही धोका नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.