भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांच्या लसींचे लाखो डोस पुढील काही दिवसांत मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना वितरित करण्यात येतील.  आरोग्य क्षेत्रांत भारत जागतिक समुदायाच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी विश्वासार्ह भागीदार होत आहे आणि हा भारताचा गौरव आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटलं आहे.

शेजारील देश तसंच भारताची प्रमुख भागीदारी असलेल्या देशांनी भारतात निर्मिती झालेल्या लसींची मागणी केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे. लसींसंदर्भातील देशातील अंतर्गत गरज आणि बांधिलकी पूर्ण करुन हे डोस निर्यात करण्यात येणार आहे. भुतान, मालदिव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सिशेल्स या देशांना आजपासून वितरण सुरु होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

लस निर्यात होणाऱ्या देशांमध्ये, विविध टप्प्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमासाठी याप्रक्रियेतील व्यवस्थापक, कोल्ड चैन साठी काम करणारे अधिकारी, संपर्क अधिकारी तसेच डेटा व्यवस्थापक यांना आवश्यक असलेलं दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु झालं आहे. अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.