दिल्लीतल्या ट्रॅक्टर फेरीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून, भारतीय किसान युनियन तसेच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानुप्रताप सिंह यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय संयोजक व्ही एम सिंह यांनी हा निर्णय जाहीर करताना, ज्यांचा विरोधाचा मार्गच वेगळा आहे, अशा लोकांना समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न असून, हिंसाचारामागे घुसखोर आहेत, अशी भूमिका ४० शेतकरी संघटनेच्या संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरुच राहील, असे किसान मोर्चाने म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे १ फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा पायी मोर्चा रद्द करण्यात आला आहे. 

दरम्यान, या हिंसक घटनांना जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. या हिंसक कारवायांमध्ये ३९४ पोलीस जखमी झाले, यापैकी अनेकांवर विविध रुग्णालयांच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या ३० वाहनांची नासधुस करण्यात आली, इतरही सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे, पोलीस आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, २०० जणांना पकडण्यात आले आहे.