देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या पथकांची मानवंदना स्विकारली. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताचं लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचं दर्शन जगाला घडलं. आज झालेल्या कार्यक्रमात विविध राज्य आणि मंत्रालयीन विभागासह निमलष्करी दल तसंच संरक्षण मंत्रालयाचे ३२ चित्ररथही सामील झाले होते. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. 

यावेळेच्या संचलनात सामील झालेल राफेल लढाऊ विमान प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं. याशिवाय भारतीय बनावटीचे रणगाडे, बहुआयामी लढाऊ वाहनं, क्षेपणास्त्र यंत्रणांचाही आजच्या सोहळ्यात समावेश होता. बांगला देशाच्या १२२ जणांच्या लष्करी पथकानंही आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात संचलन केलं.

त्याआधी आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देवून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजंदन झालं. यावेळी संचल करणाऱ्या पथकांची मानवंदना राष्ट्रपतींनी स्विकारली.