भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा  जास्त माल वाहतूक केली; हे प्रमाण २०१९ या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत साडे आठ टक्क्यांनी जास्त आहे.

या काळात  मालवाहतुकीतून रेल्वेला ११ हजार ७८८ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं आहे. हे उत्पन्न त्या आधीच्या वर्षीच्या याच काळातल्या उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे ७ टक्क्यांनी जास्त आहे.

डिसेंबर २०२० मध्ये रेल्वेनं ५ कोटी ६ लाख ७० हजार टन कोळसा ; १ कोटी ५३  लाख १० हजार टन पोलाद; ६१ लाख ३० हजार टन अन्न धान्य ;  ५२ लाख तीस हजार  टन खतं; ४३  लाख टन खनिज तेल आणि ७४ लाख ६० हजार टन सिमेंटची वाहतूक केली आहे.  माल वाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वेनं अनेक सवलतीही दिल्या होत्या.