नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, अशी माहिती रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तसंच संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी महाराष्ट्राने यश मिळवलं आहे, असंही ते म्हणाले. या अहवालात कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे.२०१९ मध्ये राज्य तिसऱ्या क्रमांकावर होतं.

२०२० मध्ये राज्यानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.नीती आयोगानं ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ हा अहवाल गेल्या बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला.इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्याचं काम केलं जातं.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नाविन्यपूर्ण क्षमतांचं मूल्यांकन करणारा अशा प्रकारचा अहवाल गेल्यावर्षी पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला होता.