हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

पुणे : हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे 'नभ अभीप्सा' शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात आले आहे. या अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भुपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदि उपस्थित होते. तसेच संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी व मान्यवर दुरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.

'नभ अभीप्सा' धातुकला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करा, ज्यामुळे विश्वातील लोक येथे ही कलाकृती बघण्यासाठी येतील. नवनिर्मिती क्षेत्रात रचना करणारे त्यामध्ये साहित्यिक, कवी, सिनेमा जगतातील कलावंत, चित्रकार, इत्यादींसाठी उच्च प्ररेणास्त्रोत बनले पाहिजे. छोट्या-छोट्या लोकांकडून कमी साधनांचा उपयोग करत आपल्या प्रतिभांपासून प्रेरणा देण्याचे काम करीत आहे ही चांगली बाब आहे. मनोरंजनासोबतच ज्ञानप्रसाराचे काम होत असल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करतांना देशभरासह विश्वातील अनेक मान्यवर आले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल श्री कोश्यारी यांनी व्यक्त केली.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा इतिहास सांगत संस्थेचे संचालक कँथोला म्हणाले, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट शिक्षणाची पुणे ही काशी आहे. सिनेमा क्षेत्र हे कला व विज्ञान यांचा अद्भभुत संगम आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने व नवीन प्रकारच्या कॅमेरे, लाईट्स तसेच चित्रपट निर्मिती विषयक दुर्मिळ साहित्यांची पहाणी केली.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते कला दिग्दर्शन विभागप्रमुख प्रसन्न जैन आणि कला निर्मिती विभागप्रमुख विक्रम वर्मा यांच्या संकल्पनेतून 'नभ अभीप्सा' हे शिल्प साकारल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.