शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध - पंतप्रधानांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शंभरावी किसान रेल्वे हिरवा झेंडा दाखवून रवाना केली, त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथून निघालेली ही रेल्वे, पश्चिम बंगालमधल्या शालिमार इथं जाणार आहे. या वर्षी ७ ऑगस्टला पहिली किसान रेल्वे, नाशिक जिल्ह्याच्या देवळाली इथून रवाना झाली होती. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यात किसान रेल्वेचं योगदान महत्त्वाचं ठरणार असून, कृषी क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याचा विश्वास, पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभीच्या काळात साप्ताहिक असलेली किसान रेल्वे आता आठवड्यातून तीन वेळा धावते, एका राज्यातले शेतकरी दुसऱ्या राज्यात आपला शेतमाल सहज पाठवू शकत आहेत, त्यांच्यासाठी नवनवीन बाजार उपलब्ध होत आहेत, छोट्या शेतकऱ्याचा अत्यल्प शेतमालही किसान रेल्वेनं पाठवता येतो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

धावतं शीतगृहं असलेल्या या किसान रेल्वेतून फळं, दूध, भाजीपाला, मासळी असा नाशवंत माल आपल्या गंतव्य स्थळापर्यंत सुरक्षित आणि रास्त दरात पोहोचवणं शक्य झालं आहे. किसान रेल्वेतून शेतमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना मालभाड्यात ५० टक्के सवलत दिली जात असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.