माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोरीवली इथल्या अटल स्मृती उद्यानात जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार सुनील राणे, भाई गिरकर, इत्यादी उपस्थित होते. तिथं निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृती राज्यपालांनी पहिली तसंच वाजपेयी यांच्या जीवनावरच्या आभासी प्रश्नमंजुषेत भाग घेतला.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुशासन दिन साजरा केला जात आहे.

पुण्यात; भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीनं विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. यामध्ये युवा मोर्चाच्या वतीनं नागरिकांची मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम पुण्याचे खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.

भाजपा महिला आघाडीनं अटल बस सेवा या उपक्रमा अंतर्गत कार्यरत असलेल्या बस वाहक आणि चालकांचा सत्कार केला.नू म वी प्रशालेच्या मैदानावर रक्तदान शिबिर घेण्यात आलं.

धुळे जिल्हा भाजपानं आज धुळ्यात राम पॅलेस इथं लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला. खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्यासह धुळे तालुक्यातले असंख्य शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बुलडाणा इथंही भाजपा आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करुन आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करुन सुशासन दिन साजरा करण्यात आला.