चार राष्ट्रांच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतींना आपले परिचय पत्र केले सादर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (दि. 20 नोव्हेंबर, 2020) आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हंगेरी, मालदीव, चाड, ताजिकिस्तान या चार देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांच्या परिचय पत्रांचा स्वीकार केला. ज्या दूतांनी आपले परिचय पत्र आज सादर केले, त्यांचा माहिती पुढीलप्रमाणे आहे:-

1. हंगेरीचे राजदूत सन्माननीय आंद्रस लॅस्लो किराले

2. मालदीवचे उच्चायुक्त सन्माननीय डॉ. हुसैन नियाझ

3. चाडचे राजदूत सन्माननीय सौन्गुई अहमद

4. ताजिकिस्तानचे राजदूत सन्माननीय लुकमॉन

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी राजदूत आणि उच्चायुक्त यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. ते म्हणाले, या चारही देशांबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि  शांतता तसेच समृद्धी यांच्याविषयी समान दृष्टीकोणावर हे संबंध आधारित असल्यामुळे ते अधिक खोलवर रूजले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये 2021-2022 या वर्षात अस्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या उमेदवारीचे या चारही देशांनी समर्थन केले होते, याबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी सर्व देशांच्या सरकारांचे आभार व्यक्त केले.

कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांनाच सामूहिक आरोग्य आणि मानवतेच्या कल्याणासाठी  आर्थिक सहकार्य करणे  आवश्यक ठरले  आहे, असे राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले. आंतरराष्ट्रीय संघटना या महामारीवर उपाय शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे आणि आता या संकटातून संपूर्ण जग अधिक शक्तिशाली बनून बाहेर पडेल, अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.