आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आत्मनिर्भर भारत-तीन अंतर्गंत १२ योजनांद्वारे २ लाख ६५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजवर एकूण २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर झाले असून, हे पॅकेज जीडीपीच्या १५ टक्के असल्याचे, निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ लाख ४३ हजार कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी २५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलासाठी नाबार्डच्या माध्यमातून वितरित झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कोविडमधून बाहेर पडत असताना रोजगाराला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना राबवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत नव्या पात्र कर्मचाऱ्यांना आगामी दोन वर्ष सबसीडी देण्यात येईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रांना दिलेली हमीयोजना ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आजवर ६१ लाख कर्जदारांना २ लाख कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केंद्रसरकारने दहा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरे जाताना मदत होणार आहे. कालच या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
बांधकाम व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी निवासी बांधकामाचे विकासक आणि घर खरेदीदारांना आयकरात दिलासा देण्यात येणार आहे, तसेच कृषीक्षेत्राला सहाय्यभूत असणाऱ्या खत निर्मिती क्षेत्राला ६५ हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी “लाईन ऑफ क्रेडिट”साठी एक्झीम बँकेला ३ हजार कोटी रुपये देणार आहे. कोविडच्या लसीच्या संशोधन आणि विकासासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.