अखेर कोविड सेंटरमधील कामगारांना मिळाले वेतन


पिंपरी : चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक महिन्यांपासून वेतन देण्यात आले नव्हते. ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन थकविल्यामुळे कामगारवर्गामध्ये नैराश्याचे वातावरण होते. हा प्रकार शहरातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये धाव घेत कंत्राटदाराला जाब विचारला, कामगारांना वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देताच कंत्राटदाराकडून कामगारांना वेतन अदा करण्यात आले.


महाराष्ट्रासह देशावर कोव्हिडं 19 कोरोनाचे महाभयंकर सकंट उभे राहिले आहे. अशा काळात कोविड सेंटरमध्ये कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेले कामगार आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. परंतू ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा फटका हा कामगारांना बसत आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेतन मिळाले नव्हते, याबाबत कामगारांनी ठेकेदाराकडे वेतनाची मागणी केल्यावर त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात होती. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, सागर बहूले, राष्ट्रवादीचे विशाल वाकडकर, विशाल काळभोर, प्रसाद कोलते, विष्णू लोखंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदारास धारेवर धरले व वेतन दिवाळीच्या आधी अदा करण्याच्या सुचना केल्यात, याची दखल घेत कंत्रादराकडून कामगारांना वेतन देण्यात आले. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.