नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
• महेश आनंदा लोंढे
पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केल्या.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा सविस्तर आढावा घेऊन अपर जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले, प्रत्येक अधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. आचारसंहिता भंग झाल्याचे आढळून आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री देशमुख म्हणाले निवडणूक व मतमोजणी कामासाठी योग्य ते नियोजन करावे. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात. कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र स्थळी खबरदारीच्या दृष्टीने आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे सांगून निवडणूकीचे काम सुरळीत होण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था, खर्च व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण व वाहतूक आराखडा, निवडणूक साहित्य मागणी व वितरण, मतदार यादी वितरण, टपाली मतपत्रिका, तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कामकाज, स्वीप कार्यक्रम, मतदारांना सोयी सुविधांची अंमलबजावणी करणे आदी विविध बाबींचा आढावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आढावा घेतला. याकामी सुयोग्य नियोजन करुन निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी आपापली जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करा, असे ते म्हणाले.
बैठकीत उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत सांगून आजवर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.