युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं- पंतप्रधान


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असून आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं.

नवी दिल्ली इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी दिल्लीचा ५१ वा वार्षिक पदवीप्रदान समारंभ आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून पंतप्रधान बोलत होते.

आय आय टी दिल्ली यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त आणि आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 
कोविड-१९ च्या वैश्विक आपत्तींनं जागतिकीकरणाबरोबरच आत्मनिर्भरतेचं महत्त्व अधोरेखित केलं.

देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्याचं सामर्थ्य नवोन्मेषांमध्ये असून गावागावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत हे तंत्रज्ञान पोचलं पाहिजे, तरच त्यांचं जीवन अधिक सुखकर होऊ शकेल, असं पंतप्रधान म्हणाले.