मुंबई सेंट्रलजवळील सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंट्रल मॉलला काल रात्री आग लागली. व्यावसायिक आस्थापनं असलेल्या या तीन मजली इमारतीत आग झपाट्यानं पसरली. आगीचे २४ बंब आणि पाण्याचे १६ टँकर्स यांच्या मदतीनं २५० अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


मॉल शेजारी असलेल्या ऑर्किड टॉवर या गगनचुंबी इमारतीतल्या साडेतीनशे लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मॉलला लागून असलेले रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.


अग्निशमन दलाच्या दोन जवानांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यापैकी एकाला गुदमरल्यामुळे जे.जे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.