राज्यातलं कोरोनारुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक २ दशांश टक्क्यावर


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल गेल्या तीन महिन्यातले सर्वात कमी म्हणजे ३ हजार ६४५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्णसंख्या,१६ लाख ४८ हजार ६६५ झाली आहे. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक २ दशांश टक्के झालं असून काल ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

  राज्यात कालपर्यंत एकूण १४ लाख ७०‌ हजार ६६० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख ३४ हजार १३७ कोरोनारुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात काल अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच एका दिवसातल्या कोरोना मृतांचा आकडा शंभरापेक्षा कमी होता.

  राज्यात काल ८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर सध्या २ पूर्णांक ६३ शतांश टक्के एवढा आहे. सध्या राज्यात २५ लाख ३० हजार ९०० जण गृह विलगीकरणात, तर १३ हजार ६९० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.